सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा संपूर्ण प्लॅन गँगस्टर रोहित गोदारा याचा असल्याचा आरोप आहे.
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईस्थित घरासमोर रविवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या घरासमोर सहा राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी ही सलमान खानच्या घराच्या बालकनीत देखील झाडण्यात आली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. फायरिंगची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा संपूर्ण प्लॅन गँगस्टर रोहित गोदारा याचा असल्याचा आरोप आहे.
दरम्यान गेल्या तीन आठवड्यांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा( NIA) कडून रोहित गोदारा याच्या बायोमेट्रिक तपशीलांचा शोध घेतला जात आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्या झाली होती. या हत्येमध्ये आणि 2022 ला झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल याच्या हत्येमध्ये देखील गोदाराचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील धक्कादायक घटना, फनफेअरमध्ये 9 वर्षांचा मुलाचा मृत्यू
कोण आहे रोहित गोदारा?
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार रोहित गोदारा हा सध्या जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचा सर्वात जवळचा सहकारी आहे. तो युकेमधून लॉरेंस बिश्रोईची संपूर्ण गँग सांभाळतो. गोदारा हा बिकानेरचा रहिवासी असून हत्या, खंडणी यासारख्या 35 गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे.
दरम्यान सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा या प्रकरणाच्या तपासाला लागली आहे. या प्रकरणात आता तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पनवेल येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. रविवारी पहाटे पाच वाजता मुंबईतील गॅलक्सी या सलमान खानच्या राहत्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. पोलिसांचं पथक आरोपींच्या मागावर होतं. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सूरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.