बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजली आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, यानंतर हल्लेखोरांनी या व्यक्तीवर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे स्टेशनवर असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गोळीबाराच्या या घटनेनंतर बदलापूर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गोळीबार नेमका का करण्यात आला? याचा शोध पोलीस घेत आहेत. बदलापूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गोळीबाराची घटना घडली आहे.
याआधीही काहीच दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्टेशनवर संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं होतं. बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर नागरिक संतापले होते, यानंतर त्यांनी बदलापूर स्टेशनवर येऊन संपूर्ण दिवस रेल्वे रोखल्या होत्या.
दुसरीकडे बदलापूर स्टेशनवरच सुलभ शौचालयाचे पैसे देण्यावरून वाद झाला, यानंतर शौचालय चालकाने तरुणावर ऍसिड हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी शौचालय चालकाला अटक केली होती, तर त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं.