75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मुंबई पोलिसांनी क्यूआर कोडद्वारे एका अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा शोध लावला आहे.

आपल्या देशात डिजिटायझेशननंतर ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी छोट्या किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येतं. एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर आपण ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी जो स्कॅनर वापरतो, त्या स्कॅनरवर क्यूआर कोड असतो. पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या त्या क्यूआर कोडमध्ये संबंधित व्यक्तीची डिटेल माहिती असते. क्यूआर कोड इतर कामांसाठीही वापरले जातात. असा एक क्यूआर कोड मुंबईतल्या एका मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. घरापासून लांब निघून गेलेल्या मुलाला परत घरी परतण्यास अशा कोडमुळे मदत झाली.

सध्या पेमेंटसाठी क्यूआर कोड मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मुंबई पोलिसांनी क्यूआर कोडद्वारे एका अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांचा शोध लावला आहे. गुरुवारी (11 एप्रिल) रात्री नऊ वाजता मुंबईच्या कुलाबा भागात 12 वर्षांचा मुलगा एकटाच भटकत होता. काही जणांनी त्याची विचारपूस केली; पण तो काहीच बोलत नव्हता. त्यामुळे कोणी तरी लगेच पोलिसांना फोन केला. कुलाबा पोलीस ठाण्याची एक टीम तिथं पोहोचली व त्यांनी मुलाची विचारपूस केली; पण तो काहीच बोलला नाही.

मुलगा काहीच बोलत नसल्याने तो मतिमंद असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांचं लक्ष मुलाच्या गळ्यात लटकत असलेल्या लॉकेटवर पडलं. पोलिसांनी हे लॉकेट उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उघडलं नाही. त्यानंतर पोलिसांनी ते लॉकेट फोडलं. त्या लॉकेटमध्ये क्यूआर कोड होता. पोलिसांनी लगेच तो स्कॅन केला आणि त्यात एका एनजीओचा मोबाइल नंबर सापडला. लगेच या नंबरवर कॉल करण्यात आला, त्यानंतर एनजीओने मुलाच्या कुटुंबाचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला. एनजीओमधल्या व्यक्तींनी सांगितलं, की ‘हा मुलगा मतिमंद आहे आणि त्याचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. त्याचं कुटुंब वरळीत राहतं.’

एनजीओकडून मिळालेल्या फोन नंबरवर पोलिसांनी तात्काळ फोन केला असता, कुटुंबातल्या कोणी तरी सांगितलं, की मुलगा दुपारपासून घराबाहेर पडला आहे; मात्र तो अजून घरी परतलेला नाही. संपूर्ण कुटुंबाला त्याची काळजी वाटत होती. काही मिनिटांत पोलिसांनी मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. मुलाला सुखरूप घरी आलेला पाहून कुटुंबीयांचे डोळे पाणावले होते.

 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...