75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Cyber Crime

Cyber Crime : सोशल मीडियावर कर्ज ॲपच्या जाहिरातीवर क्लिक करणे एका महिलेला महागात पडले. महिलेने पात्रता तपासण्यासाठी क्लिक केले असता तिच्यासोबत मोठं कांड घडलं.

Cyber Crime : सोशल मीडियाचा वापर जितका जास्त तितकाच त्याचा धोकाही जास्त असतो. सोशल मीडियावरच्या जाहिरातींद्वारे फसवणूक होण्याच्या घटना घडू शकतात. मुंबईतल्या एका महिलेला एका जाहिरातीद्वारे आलेल्या कर्जाच्या अ‍ॅपच्या लिंकवर क्लिक करणं चांगलंच महागात पडलंय.

ग्राहकांना लुबाडणाऱ्या व त्यांना जाळ्यात अडकवणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असतात. त्यामुळेच एखाद्या लिंकवर चुकून क्लिक करणं महागात पडू शकतं. कोणत्याही पडताळणीशिवाय एका क्लिकवर 50 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्समुळे अनेकांचं नुकसान झालंय. मुंबईतल्या एका महिलेला याचा जबरदस्त फटका बसला. भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 25 वर्षांच्या नोकरदार महिलेला 12 ते 15 हजार रुपयांची आवश्यकता होती. तिनं सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या एका लोन अ‍ॅपवर क्लिक केलं.

आवश्यक माहिती भरल्यानंतर कर्जाची रक्कम लिहिली. हे सगळं करून त्या महिलेला कर्ज तर मिळालं नाहीच; पण मनस्ताप मात्र भरपूर झाला. पोलिसांना दिलेल्या साक्षीनुसार, तिच्या व नातेवाइकांच्या मोबाइल क्रमांकाचा तसंच तिच्या फोटोचा अज्ञात आरोपींनी गैरवापर केला. तिच्या फोटोचा वापर करून त्याला अश्लील स्वरूप देऊन तो व्हायरल करण्यात आला. यामुळे त्या महिलेची बदनामी झाली. पीडित महिलेनं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीयांशी चर्चा केली व सगळ्या नातेवाईकांनी तिला साथ दिली. पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा तिला सल्ला दिला.

भायखळा पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेला कर्जाची आवश्यकता होती. त्यामुळे तिनं एप्रिल महिन्यात सोशल मीडियाद्वारे एक अ‍ॅप फोनवर डाउनलोड केलं होतं. कर्ज घेण्यासाठी तिनं त्या अ‍ॅपमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल क्रमांक व काही नातेवाईकांचे क्रमांकही दिले. इतकं सगळं करूनही त्या महिलेला हवं तेव्हा त्यांच्याकडून कर्ज मिळालं नाही. आणखी एक-दोन वेळा प्रयत्न केल्यावर तिनं ते अ‍ॅप मोबाइलमधून डिलीट केलं. सोमवारी (22 जुलै) पीडित महिलेला एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज मिळाला, की तुम्ही जे कर्ज घेतलंय ते लवकरात लवकर फेडा, नाही तर तुमचे अश्लील फोटो तुमच्या नातेवाईकांना पाठवू.

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये महिलेचे काही फोटो एडिट करून त्यांना अश्लील स्वरूप देण्यात आलं होतं. तसंच महिलेबाबत अश्लील भाषेत केलेलं बोलणंही त्यांनी मेसेजमध्ये लिहून पाठवलं होतं. त्यावर महिलेनं काहीच उत्तर दिलं नाही, तर त्यांनी तिचे अश्लील फोटो तिच्या नातेवाइकांना पाठवून दिले. हे सातत्यानं सुरू असल्यामुळे महिलेनं त्याबाबत नातेवाईकांशी चर्चा केली व पोलिसांकडे तक्रार दिली.

झटपट कर्ज मिळेल या आशेनं घाईनं निर्णय घेऊ नका. कर्ज घेण्याआधी त्या अ‍ॅपची अधिकृत माहिती मिळवा. अधिकृत वेबसाइटवर जा, अटी वाचा आणि बनवाट लोन अ‍ॅपपासून सावध राहा, असं मुंबई पोलिस सायबर अधिकारी एपीआय विवेक तांबे यांनी सांगितलं आहे.

कर्ज घोटाळ्यापासून कसे सावध राहाल?
– कर्जाच्या अ‍ॅपबाबत आरबीआयच्या वेबसाइटवरून आधी माहिती घ्या.
– अ‍ॅप डाउनलोड करताना ते विश्वासार्ह आहे का याची खात्री करा व मगच तुमची ओळखपत्रं द्या.
– ओळखपत्र दिल्यानं तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.
– उगाचच कोणतंही लोन अ‍ॅप डाउनलोड करू नका.
– कोणतीही लिंक किंवा एसएमएसवरून अ‍ॅप डाउनलोड करू नका.

बनावट लोन अ‍ॅप कसं ओळखाल?
– कोणत्याही अ‍ॅपवरून कर्ज घेण्याआधी त्या अ‍ॅपची वेबसाइट तपासा. तिथे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रीय बँका आणि एनबीएफसीशी टायअप झाल्याची माहिती दिलेली असते.
– कोणतंही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा. ई-मेल, एसएमएस किंवा सोशल मीडियावर आलेल्या लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड करू नका.
– योग्य अ‍ॅप असेल तर ते तुमच्याकडून केवायसी मागेल. एखाद्या अ‍ॅपनं ते मागितलं नाही तर ते संशयास्पद असू शकतं.
– जी अधिकृत लोन अ‍ॅप्स असतात, त्यावर कर्जाबाबत करार दिलेला असतो. त्यात तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम, प्रोसेसिंग फी, व्याजदर, कर्जफेडीबाबतची माहिती हे लिहिलेलं असतं. असा कोणताही करार होत नसेल, तर त्या अ‍ॅपवरून कर्ज न घेणं श्रेयस्कर ठरतं.
– कर्ज देण्याआधीच त्या अ‍ॅपकडून तुमच्याकडे फीची मागणी करण्यात आली, तर सावध व्हा. कारण बनावट अ‍ॅपकडून अशी आगाऊ फी मागितली जाते.
– कोणतंही लोन अ‍ॅप वापरण्याआधी त्याचे रिव्ह्यू वाचा. काही नकारात्मक प्रतिक्रिया असतील, तर त्याकडे डोळेझाक करू नका.

Cyber Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...