सुवर्ण नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सचं दुकान आयकर विभागाच्या रडारवर आलं आहे. जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरूममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना आयकर विभागाला 8 ते 9 किलो सोनं चौकशीत आढळून आलं. हे सोनं आरसी बाफना ज्वेलर्सचं असल्याची माहिती समोर आली आहे.
‘निवडणुकीचा माहोल आहे, कुसुंबा गावाजवळ गाडी थांबवली गेली. यानंतर पोलिसांनी गाडीचे पेपर पाहिले. यानंतर त्यांनी आयकर विभागाला सूचना केली. मग आयकर विभाग जळगाव, आयकर विभाग नाशिक या दोन्ही विभागांनी पेपरची छाननी केली. पेपर पाहिल्यानंतर गाडी सोडून देण्यात आली’, असं आरसी बाफना ज्वेलर्सचे मालक पप्पू बाफना यांनी सांगितलं.
अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात तुफान राडा; दोन गटात हाणामारी
‘काल रात्री 8 वाजता चौकशी सुरू झाली, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. खात्री करून घेतल्यावर त्यांनी सोडून दिलं. माल कुठून आला, कुणाचा माल आहे. कुणी मागवला आहे. माल कधी निघाला आहे? या पार्टीकडून आरसी बाफना याआधीपासून माल मागवतात का नाही? याची सगळी चौकशी केली’, असं पप्पू बाफना म्हणाले.
याआधीही जळगावातले प्रसिद्ध असलेले राजमल लखीचंद ज्वेलर्स ईडीच्या रडारवर आले होते. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने आर एल समूहाची तब्बल 46 तास चौकशी केली होती. या प्रकरणी ईडीने समुहाच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे आणि इतर काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आणि आर एल समुहाचे 90 लाख रुपये रोख आणि ज्वेलर्समधील सोने फ्रीज केलं होतं.