Election 2024 : राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष सर्वांनीच पाहिला आहे. मात्र, विधानसभेत या नेत्यांची पुढची पिढी समोरासमोर येणार का? अशी चर्चा रंगली आहे.
Election 2024 : राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे एका पक्षात असताना देखील या दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा समोर आले. आज दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात आहे. मात्र या दोघा नेत्यांची पुढची पिढी आता राजकारणात (Politics) सक्रिय झाली आहे. सुजय विखे (Sujay VIkhe) यांनी संगमनेरमधून (Sangamner) विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर दुसरीकडे थोरात यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) देखील आता राजकारणात सक्रिय झाल्याने आगामी काळात थोरात आणि विखे यांची पुढची पिढी समोरासमोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
काना, उकार, वेलांटी नसलेला अहमदनगर जिल्हा. मात्र या जिल्ह्यातील थोरात आणि विखे या दोन मातब्बर नेत्यांनी राज्यात वर्चस्व निर्माण केलं. एका पक्षात असताना देखील या दोन्ही नेत्यांचं कधीच जमलं नाही. मात्र, आता दोन्ही नेते परस्पर विरोधी पक्षात आहे. हे सगळं चित्र असतानाच थोरात आणि विखे यांची पुढील पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. नगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पक्ष निर्णय घेईल. मात्र, माझी तयारी आहे, असं सूचक व्यक्त करताना सुजय विखे यांनी एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांना आव्हान दिलं आहे.
प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या देखील सक्रिय राजकारणात सहभागी झाल्या आहेत. संगमनेर शहरात इंदिरा महोत्सव या नावाने महिलांसाठी विशेष उपक्रम राबवत त्यांनी महिलांना एकत्रित केलं. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यातच नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी भाषणात जयश्री थोरात यांना विधानसभेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयश्री थोरात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना प्रारंभ झाला आहे. प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर बोलताना जयश्री थोरात यांनी निवडणूक आत्ताची की भविष्यातील हे साहेब ठरवतील, असे उत्तर दिल्याने आगामी विधानसभेत संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण? यावरून चर्चा सुरू झाली आहे.
विखे-थोरातांची पुढील पिढीही आमनेसामने येणार?
महिलांसाठी आयोजित इंदिरा महोत्सव या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जयश्री थोरात यांचे जाहीर भाषणात कौतुक देखील केलं. जयश्रीवर 2019 ला टाकलेली जबाबदारी तिने यशस्वीपणे पार पाडली, असे उद्गगार थोरात यांनी भाषणातून व्यक्त केले. त्यामुळे कन्या जयश्री यांची एक प्रकारे राजकीय पेरणीच थोरात यांनी सुरू केली आहे. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लोक जे ठरवतील तो निर्णय आम्ही घेऊ, असे सूचक वक्तव्य करत आगामी काळात जयश्री थोरात निवडणूक रिंगणात असतील का नाही हे सांगणं मात्र बाळासाहेब थोरातांनी टाळलं. राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष राज्याने नेहमीच पाहिला आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची पुढची पिढी समोरासमोर येणार का? आणि हा संघर्ष देखील असाच सुरूच राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.