रुग्णवाहिका नसल्याने आई-वडिलांना आपल्या मृत मुलांची कलेवरं घेऊन चिखलातून 15 किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागले. चिमुक्या बाजीराव आणि दिनेशने ताप आल्यानंतर जीव सोडला. गडचिरोलीतील धक्कादायक बातमी.
एकीकडे राज्यातील सरकार विकासाच्या मोठया गप्पा मारत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात नागरिकांची मुलभूत गरज असलेली आरोग्य यंत्रणा औषधालाही अस्तित्त्वात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) रुग्णवाहिकेची सोय नसल्याने आई-वडिलांना आपल्या चिमुकल्या मुलांचे मृतदेह घेऊन 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. याप्रकरणात ग्रामीण भागातील लोकांचा औषधोपचारापेक्षा अंधश्रद्धा आणि जुन्या रुढींवर असलेला विश्वास कारणीभूत असला तरी आरोग्य यंत्रणेची अनुपलब्धताही तितकीच कारणीभूत आहे. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगावात ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
आजोळी आलेल्या दोनभावंडांना ताप आला. अशिक्षित आई- वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवज पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने ४ सप्टेंबरला घडली आहे. बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे.
दोन दिवसांपूर्वी ‘ आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला- आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी दिली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही भावंडांचे कलेवर घेऊन भाबड्या आशेपोटी हे दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. त्यानंतर नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले.
या घटनेबाबत गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल,असे डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.