75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

cvigil

Loksabha Election 2024 | cVIGIL App : एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाचा उमेदवार पैसे किंवा वस्तू वाटत असेल किंवा निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर कोणताही नागरिक सीविजिल cVIGIL अॅपवरून तक्रार करु शकतो.

cVIGIL App : जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम शनिवारी जाहीर करण्यात आला. यावेळी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी कशाप्रकारे तयारी सुरु केली आहे, याची सविस्तर माहिती दिली. लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) निष्पक्ष आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) विशेष दक्षता घेण्यात आली आहे. देशाच्या कुठल्याही भागात निवडणुकीच्या काळात हिंसाचार होऊ नये, यासाठी सीआरपीएफच्या तुकड्यांकडून सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी पैसे वाटल्याच्या किंवा प्रचाराचे नियम मोडल्याच्या अनेक घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी मतदारांना सीविजिल cVIGIL अ‍ॅपबाबत माहिती दिली. मतदारांनी असे प्रकार रोखण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाचा उमेदवार पैसे किंवा वस्तू वाटत असेल किंवा निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर कोणताही नागरिक सीविजिल cVIGIL अ‍ॅपवरून तक्रार करु शकतो.

तुम्हाला पैसे वाटत असल्याचा किंवा वेळेनंतर प्रचार होत असेल तर केवळ त्याचा एक फोटो काढायचा आहे. हा फोटो तुम्हाला सीविजिल cVIGIL अॅपवर अपलोड करता येईल. ते शक्य नसेल तर तुम्ही एक मेसेजही सीविजिल cVIGIL अ‍ॅपवर पाठवू शकता. त्यानंतर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागणार नाही. तुमच्या मोबाईल लोकेशनचा वापर करुन अक्षांश-रेखांशावरुन तुमचा ठावठिकाणा शोधला जाईल. त्यानंतर 100 मिनिटांत निवडणूक आयोगाचे पथक त्याठिकाणी पोहोचेल आणि तुमच्या तक्रारीचे निवारण करेल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोणती आचारसंहिता असेल, याबाबत माहिती दिली. तुम्ही टीका करू शकता. पण यावेळी कोणत्याही प्रकारे अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पाऊले उचलू शकतात, असे राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावरुन अफवा पसरवत जात असतील तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ‘मिथ Vs रिअॅलिटी’ अंतर्गत खरी माहिती प्रसिद्ध करु, असेही राजीव कुमार यांनी सांगितले. निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका नको. धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...