संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टवेळी सीबीआयला सांगितलं की, ८ ऑगस्टच्या रात्री सेमीनार हॉलमध्ये का घुसला होता?
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने धक्कादायक असा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टवेळी सीबीआयला सांगितलं की, ८ ऑगस्टच्या रात्री सेमीनार हॉलमध्ये का घुसला होता? एका रुग्णाची प्रकृती बिघडली होती आणि त्याला ऑक्सिजनची गरज होती. त्यामुळे डॉक्टरांना शोधत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमीनार हॉलमध्ये गेलो होतो असा दावा संजय रॉयने केलाय.
संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टवेळी सांगितलं की, नशेत सेमिनार हॉलमध्ये घुसलो तेव्हा ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह तिथं पडला होता. ट्रेनी डॉक्टरला हलवून पाहिलं तर ती मृत झाली होती. कोणतीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे मी घाबरलो. घाबरल्यानं गडबडीत तिथून बाहेर पडताना कशाला तरी धडकलो. या गडबडीत कानातला ब्लुटूथ तिथंच पडला असंही संजय रॉयने म्हटलंय.
घटनेच्या दिवशी हॉस्पिटलच्या मेन गेटवर कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता आणि कुणीही अडवलं नाही असं संजय रॉयने म्हटलंय. सीबीआयने या प्रकरणी दोन सुरक्षा रक्षकांचीही पॉलिग्राफ टेस्ट केली. त्या दोन सुरक्षा रक्षकांची ड्युटी मेन गेटवर होती. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणात संजय रॉय याच्यासह १० जणांची पॉलिग्राफ टेस्ट झाली आहे. संजय रॉयची टेस्ट २५ ऑगस्टला कोलकाताच्या प्रेसिडन्सी जेलमध्ये झाली होती. संजयशिवाय आरजी कर रुग्णालयाचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष, एएसआय अनुप दत्ता, 4 फेलो डॉक्टर, 2 सुरक्षा रक्षक आणि एका वॉलंटियरचाही समावेश आहे.
आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ८-९ ऑगस्टच्या मध्यरात्री एका महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये तिचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणात संजय रॉय याला अटक केलीय. या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.