Vanraj Andekar : आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकते अशा शब्दात बहिणीने धमकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची हत्या झाली.
Vanraj Andekar : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानेच ही हत्या केलीय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या गोळीबार आणि हत्येच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. वनराजच्या बहिणीने पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर त्याला धमकी दिली होती. आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकते अशा शब्दात धमकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची हत्या झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनराज आंदेकर हे रविवारी रात्री साडे आठ वाजता नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात उभा होते. तेव्हा दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. आंदेकर यांना गोळी लागली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. हे वार वर्मी बसल्यानं आंदेकर गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केलीय. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे.
सख्ख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना पोलीस ठाण्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. वनराज आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ असं धमकावलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची खरोखरच हत्या झाली.