75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Prasad Pujari : कधी काळी मुंबई हे शहर गँगस्टर्ससाठी नंदनवन समजलं जातं होतं. या शहराने आतापर्यंत अनेक गँगस्टर, त्यांची गँगवॉर्स आणि त्यांनी केलेले गुन्हे बघितले आहेत. अशाच गँगस्टर्समध्ये प्रसाद पुजारी या गुंडाचा समावेश होता. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर पुजारी(Prasad Pujari) चीनमध्ये पळाला होता.

सीमेच्या पलीकडे असल्यामुळे पोलीस आपलं काहीही बिघडवू शकणार नाहीत, या गैरसमजामध्ये तो गेली 20 वर्षं जगत होता; पण ज्या कायद्याच्या कचाट्यातून तो निसटला होता त्याच कायद्याचा वापर करून त्याला भारतात आणण्यात आलं आहे. भारतातले पोलीस आणि तपास यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. पुजारीचं चीनमधून मुंबई विमानतळावर प्रत्यार्पण करण्यात आलं. तिथे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर पुजारीवर(prasad Pujari) खून आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. भारतात नसतानाही तो कुटुंबीयांच्या मदतीने गुन्हे करत होता. काही वर्षांपूर्वी पुजारीने शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. 19 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या हल्ल्यात जाधव यांचा जीव कसाबसा वाचला होता. त्यानंतर इंटरपोलने पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. 2020मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुजारीची आई इंदिरा पुजारीला (वय 62 वर्षं) खंडणीच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर चीनमध्ये असलेल्या पुजारीच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले.

कायद्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पुजारी 20 वर्षांपूर्वी सीमा ओलांडून चीनमध्ये पळाला होता. तिथे त्याने एका चिनी मुलीशी लग्न केलं. तो आपल्या पत्नीसह लुओहू जिल्ह्यातल्या शेन्झेन शहरात राहत होता. तो प्रवासी व्हिसावर चीनमध्ये गेला होता. मे 2008मध्ये त्याची मुदत संपली होती. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मार्च 2008मध्ये पुजारीला चीनमध्ये तात्पुरता निवास परवाना देण्यात आला होता. त्याची मुदत मार्च 2012मध्ये संपली होती.

परदेशात पळालेल्या गुन्हेगारांना भारतात आणण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक सरकारांची मदत घेऊन अशा गुन्हेगारांना कायदेशीर चाचणी पूर्ण करण्यासाठी पकडून भारतात आणलं जात आहे. या मोहिमेअंतर्गत जवळपास 20 वर्षांपासून फरार असलेला गुंड प्रसाद पुजारीचं चीनमधून मुंबई विमानतळावर प्रत्यार्पण करण्यात आलं. त्याच्यावर भारतीय दंडसंहिता आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...