Sharad Pawar conditions on Z+ Security : आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असं पवार म्हणाले होते.
Sharad Pawar : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सुरक्षा घेण्याआधी शरद पवार यानी मोदी सरकारपुढे काही अटी ठेवल्या असल्याची माहिती आहे. कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार ही अटही पवारांनी ठेवली आहे.
शरद पवार यांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. यावेळी शरद पवारांतर्फे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मी स्वत: आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असं पवार म्हणाले होते.
शरद पवार यांनी केंद्रासमोर ठेवलेल्या अटी कोणत्या?
– केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार
– कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
– याशिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
यासह काही अटी शर्थींचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले आहे. या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार आहे.
कोणत्या गोष्टींमुळे केंद्रीय गृह खात्याला आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असे वाटते, त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबींची यादी पवारांनी गृह खात्याकडे मागितली होती. यापूर्वीही शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती, तसेच सुरक्षा देण्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते, पण शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. शरद पवारांनी ही एक प्रकारची गुप्तहेरगिरी करण्याची पद्धत असल्याचे सांगत केंद्रास नकार दिला होता.
झेड प्लस सुरक्षा काय असते?
झेड प्लस (Z+) सुरक्षा ही भारतातील सुरक्षिततेची सर्वोच्च श्रेणी मानली जाते. Z+ सुरक्षेत दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ प्रशिक्षित कर्मचारी संबंधित व्यक्तीजवळ तैनात असतात. हे सर्व कमांडो २४ तास त्या व्यक्तीभोवती बारीक नजर ठेवून असतात. सुरक्षा व्यवस्थेत असलेला प्रत्येक कमांडो मार्शल आर्टमध्ये तज्ज्ञ असतो. यासोबतच त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रेही असतात. भारतात झेड प्लस सुरक्षा मिळालेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक बडे चेहरे आहेत.