Crime News : वाळू तस्करीवरुन राडा प्रकरणात उबाठा गटाच्या तालुका आणि शहरप्रमुखाला अटक करण्यात आली आहे.
Crime News : नंबर नसलेल्या हायवातून वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून मुखेड शहरातील दोन तरुणांना रॉड, काठी व तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 7 जूनच्या सकाळी चांडोळा (ता.मुखेड) तांडाच्या वळणावर घडली. यातील 6 जणांवर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी उबाठा गटाचा तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे आणि शहर प्रमुख शंकर चिंतमवाड यांच्यासह दोन्ही गटातील 10 जणांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
चांडोळा चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाची दुचाकीची धडक लागली. त्यावरून हा राडा झाला, असं सांगण्यात आलं. परस्पर विरोधी तक्रारीवरुन पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान वाळू वाहतूक करायची असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देत उबाठा गटाचा तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, शहरप्रमुख शंकर चिंतमवाड यांनी अन्य सहकाऱ्यांसोबत सशस्त्र हल्ला केल्याची फिर्याद दुसऱ्या गटाकडून देण्यात आली. त्यावरून जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी उबाठा गटाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. दरम्यान कालचा राडा अवैध वाळू वाहतुकीच्या कारणातून झाल्याचे सांगण्यात आले. याचा तपास देखील सुरू असुन वाळू तस्करी प्रकरणात या पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे का? यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
रस्त्यावर तलवार आणि रॉडने हाणामारी
चांडोळा येथे वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवाने दुचाकीस्वारांना कट मारल्याने ते पडले. याचा जाब दुकाचीस्वारांनी हायवा चालकार विचारला. त्यावेळी गाडीच्या पाठीमागे असलेल्या क्रेटा गाडीतून काही तरुण तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन उतरले. यातून वाद वाढला आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये तिघेजण जखमी झाले.