Online Fraud : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीची तब्बल 20 लाखांची फसवणूक केली आहे.
Online Fraud : मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत बोगस कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी नवोदिता समरजितसिंह घाटगे (वय 37, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांना 20 लाखांचा गंडा घातला. हा प्रकार 2 ते 5 जून दरम्यान घडला. घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी 3 संशयितांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नवोदिता घाटगे यांच्या मोबाइलवर रविवारी (दि. 2) फोन आला. कस्टम अधिकारी असल्याचे सांगत, तुम्ही मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ, तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड आहे. हा गंभीर गुन्हा असून, तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भीती घातली. त्यानंतर दुसऱ्या दोन नंबरवरून फोन आले. त्यांनी आपण सीबीआयमधील गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही केलेला गुन्हा गंभीर असून, तो दाखल करायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने 20 लाख रुपये ऑनलाइन वर्ग करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाटगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनिल यादव, अजित (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) यांच्यासह कस्टम अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला.
Crime News : वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून रॉड आणि तलवारीने तरुणांवर वार; उबाठा गटाच्या दोघांना अटक
सायबर क्राईमपासून कसं सुरक्षित रहावं?
1. अनोळखी नंबरवरून येणारे बक्षीस विजेते संदेश आणि ईमेलवर चुकूनही क्लिक करू नका.
2. सोशल मीडियावर अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे टाळा.
3. बँक तपशील आणि OTP सारखी माहिती कोणाशीही शेअर करू नका.
4. ईकॉमर्स साइट वापरत असताना, शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडा.
5. व्हिडिओ कॉलवर बोलताना अधिक काळजी घ्या.
ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यास काय करावे?
1. तुमची बँक फसवणूक झाली आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर ताबडतोब बँकेच्या स्थानिक शाखेशी किंवा संबंध व्यवस्थापकाशी संपर्क साधा.
2. एटीएम कार्ड/क्रेडिट ब्लॉक करा.
3. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करा.
4. फसवणुकीबद्दल कुटुंब आणि मित्रांना सांगण्यास अजिबात संकोच करू नका.
5. जर हा मुद्दा महिलांशी संबंधित असेल तर तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करू शकता.