राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. डॉ. नितीन कोडवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नितीन कोडवतेंकडे काँग्रेस प्रदेश सचिवपदाची जबाबदारी होती. तसेच त्यांच्या पत्नी चंदा कोडवते 2019 साली काँग्रेसच्या गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपनं काँग्रेसला दुसरा मोठा धक्का दिला आहे. नितीन कोडवते यांनी काँग्रेसला रामराम केला असून, ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसमधील गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण आणि आता नितीन कोडवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. नितीन कोडवते हे काँग्रेसचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार होते.
भाऊसाहेब कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश
दरम्यान दुसरीकडे शिर्डीमध्ये शिवसेनेनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. . श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून श्रीरामपूरची निवडणूक लढवली होती.