काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गानं पुढे जात आहे, त्याचं मला काही सोयरसुतक वाटत नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली, आणि त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.
नेमकं काय म्हणाले गौरव वल्लभ?
‘काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, त्याचं मला काही सोयरसुतक वाटत नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही, किंवा सकाळ संध्याकाळ देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. म्हणूनच मी राजीनामा देत आहे. सर्व पदांवरून आणि काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून ‘असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे.
निरुपम यांची हाकालपट्टी
दरम्यान दुसरीकडे कालच काँग्रेसनं संजय निरुपम यांची पक्षामधून हकालपट्टी केली आहे. मित्रपक्षांविरोधी भूमिका घेतल्याबद्दल पक्षाने ही कारवाई केली असून, त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबीत करण्यात आलं आहे. बुधवारी निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. निरुपम यांच्या हाकालपट्टीनंतर आता गौरव वल्लभ यांनी देखील राजीनामा दिला आहे.