जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका तरुणाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हता.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका तरुणाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. लोखंडी रॉडने एकापाठोपाठ तब्बल 13 वार करून या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, घटनास्थळावर लोक फक्त बघ्याची भूमिकेत होते. सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तो ही पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची शुक्रवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात प्रमोद रामदास वाघ (38) याचा मृत्यू झाला आहे. सिन्नर फाटा परिसरात यश टायर दुकान असून तेथे ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ हे सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते. यावेळी संशयित योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी प्रमोद यांना अडवलं.
जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने वाघ याच्यावर रॉडने हल्ला केला. त्यात वाघ गंभीर जखमी झाला. वार वर्मी लागल्यामुळे वाघ जागेवर कोसळला. आरोपी योगेश पगारे याने एकापाठोपाठ असे 13 वेळा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला. सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नव्हता.
त्याला उपचारासाठी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला. जागेच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळतात नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.