सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. ‘भाजपने शेवटपर्यंत त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले, पण आम्ही मनाने स्ट्राँग असल्यामुळे ऑफर नाकारली, असा खुलासा शिंदेंनी केला.
सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिली होती, याचा खुलासा केला आहे.
‘प्रत्येकाची निती असते. भाजप ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. भाजपमध्ये प्रवेशासाठी येतात, मात्र आम्ही आमच्या मनात स्ट्रॉंग आहोत. पण प्रणिती यांनी काँग्रेससोबत प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. गांधी यांचा काँग्रेस पक्ष सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
‘त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही. प्रत्येक वेळा त्यांनी ऑफर दिली. पण प्रणिती यांना हे पटत नाही. ज्या लोकांनी 3 वेळा निवडून दिलं, त्यांना दगा देता येणार नाही, असंही शिंदे म्हणाले.
मनसे आणि भाजप युतीवर सुशील कुमार शिंदे यांचे बोलण्यास नकार दिला. हा इलेक्शन प्रोसेस मधला निरनिराळ्या पार्टीचा चालणारा भाग आहे. त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदेंनी दिली.
‘मोहिते पाटील आमच्या पार्टीत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलू. मोहिते पाटलांना सध्या तरी आमच्याकडून कोणती ऑफर नाही, असंही सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलंय.