मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये माढ्याच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा तिढा सोडवण्यात भाजपला यश आलं आहे. रामराजे निंबाळकर यांनी महायुतीसाठी काम करण्याचा शब्द अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर याबाबतची बैठक झाली. उत्तम जानकर यांनीही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
माढ्यासंदर्भात तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला अजित पवार, श्रीकांत भारतीय, रामराजे निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे उपस्थित होते. या बैठकीत सगळ्याच नेत्यांनी माढा लोकसभेत महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्याचं काम करण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांना रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. माढ्यातील 6 आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काम करणार आहेत. या आमदारांनी तसं आश्वासन दिलं आहे. तसंच मोहिते पाटील कुटुंबाचीही लवकरच समजूत काढली जाणार आहे.
निंबाळकर-मोहिते वाद कशावरून?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदान संघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती, यावेळी मोहिते पाटील गटाने निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. माळशिरस विधानसभा मतदार संघातून खासदार निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली, यामुळे निंबाळकर विजयी झाले. यानंतर मतदार संघात विकास कामाचं श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून मोहिते पाटील गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली होती.
माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील गटाने मागणी केली होती. मात्र भाजपने याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, तेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः मोहिते-पाटील यांची भेट घेईन असं सांगितलं.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते-पाटील गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. उमेदवार बदलावा अशी मागणी करण्यासाठी मोहिते पाटील यांच्याकडून भाजपवर दबाव येऊ लागला. रविवारी मोहिते पाटील गटाने अकलूज येथे बैठक घेतली मात्र संबंधित विषयावर रामराजे निंबाळकर यांच्यासह थेट भाष्य करण्याचे टाळलं.
शरद पवार माढ्यात डाव टाकणार?
माढा लोकसभा मतदार संघाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केलं असून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील किंवा बाबासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची हालचाल सुरू केली आहे. या अगोदर दोन वेळा माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, त्यामुळे आता पुन्हा हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.