75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

शिर्डी

Ahmednagar News : साईबाबांच्या शिर्डीला सौर शहर (सोलार सिटी) करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याची गरज आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शंभर टक्के सौर शहर करण्याचा महावितरणचा संकल्प आहे, अशी माहिती महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी दिली.

महावितरणच्या शिर्डी उपविभागाच्या वतीने शिर्डीतील शांती कमल भक्तनिवास येथे आयोजित ग्राहक संवाद मेळाव्यात ग्राहक, वित्तीय संस्था, सौरप्रणाली विक्रेते आणि महावितरणचे अभियंते यांच्याशी संवाद साधताना नुकतेच ते बोलत होते.

यावेळी रेशमे म्हणाले, शिर्डीला पर्यावरणपूरक सौर शहर करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५० मेगावॅट क्षमतेचा सौर वीजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. शिर्डी शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा, सरकारी कार्यालये या वर्गवारीतील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे

त्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला केंद्र शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेचा शिर्डी शहरातील सर्व वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. खासदार वाकचौरे म्हणाले, शिर्डी हे सौर उर्जा निर्मितीसाठी अनुकूल शहर आहे.

या योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. सौर उर्जा ही काळाची गरज असून प्रत्येक घरगुती वीज ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा.

कोळेकर म्हणाले, शिर्डी शहराला आंतरराष्ट्रीय ओळख असून शिर्डीतील सर्व शासकीय कार्यालये सौर उर्जेवर आणण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्र येऊन ही योजना राबविल्यास शिर्डी शहर सौर होण्यास अडचण येणार नाही.

औंढेकर म्हणाले, सौर उर्जेचा वापर वाढल्यास भविष्यात वीज जोडणीसाठी कुणालाही महावितरणच्या कार्यालयात येण्याची गरजच राहणार नाही. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यावर महावितरणचा भर राहणार आहे. महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी प्रास्ताविकात शिर्डी सौर शहर नियोजन आराखड्याची माहिती दिली.

शिर्डी सौर शहर करण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य लाभत असून लवकरच सौर शहर म्हणून शिर्डी नावारूपाला येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे, सौर ग्राहक विनोद गोंदकर, रमेश गोंदकर, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक सचिन खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महावितरणच्या संगमनेर व शिर्डी उपविभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिर्डी
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...