75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

कर्ज

 

माणसाच्या आयुष्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. क्षुल्लक कारणांवरून एकमेकांचे जीव घेण्याच्या घटना घडत आहेत. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यास उशीर केल्याच्या कारणावरून सावकाराने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी (31 ऑगस्ट) उपचार सुरू असताना पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचं पार्थिव ग्वाल्हेरमध्ये आणल्यावर संतप्त नागरिकांनी हनुमान तिराहा इथे मृतदेह ठेवून रास्ता रोको केला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना शांत केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनकगंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या जिवाजी गंजमधल्या नागदेव गल्लीमध्ये राहणारा भीमा उर्फ दीपक सविता हा एका सलूनमध्ये काम करायचा. काही काळापूर्वी त्याने मुलाची फी भरण्यासाठी ऋषभ तोमर नावाच्या व्यक्तीकडून 20 हजार रुपये उसने घेतले होते. तो हे पैसे परत करू न शकल्याने ऋषभ दीपकचा सतत छळ करत होता.

20 ऑगस्टला रोजी ऋषभने दीपकला जिवाजी गंजमधल्या कार्तिकेय मंदिराजवळ बोलावलं होतं. पीयूष लोधी या आपल्या मित्रासोबत आरोपी तिथे आला. त्याने अगोदर गोळीबार केला आणि नंतर दीपकला लाथाबुक्कांनी मारहाण केली. या घटनेत दीपक गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला उपचारासाठी जयआरोग्य रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं; मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला दिल्लीला रेफर केलं होतं.

दोन भावांमध्ये दीपक लहान होता. त्याचा मोठा भाऊ आजारी असतो. त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी दीपकवर होती. दीपकला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ तोमर आणि पीयूष लोधी या दोन्ही आरोपींना दीपकवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आधीच अटक करण्यात आली होती आणि खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आता दीपकचा मृत्यू झाल्याने दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी उशिरा दीपकचा मृतदेह दिल्लीहून ग्वाल्हेरला आणण्यात आला. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रास्ता रोको केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले तेव्हा नागरिकांनी पाच मागण्या केल्या. यामध्ये मृताच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई, कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी, दोन्ही आरोपींच्या घरावर बुलडोझरची कारवाई, दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा आणि निष्काळजीपणा करणारे पोलीस आणि डॉक्टरांवर कडक कारवाई या मागण्यांचा समावेश आहे.

 

कर्ज
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...