राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होत आहे.राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत असतानाच काही शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह गारपीट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत असतानाच काही शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह गारपीट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. 22 एप्रिल रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.
राजधानीत तापमान कायम
राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. राजधानी मुंबईत मात्र हवामान कोरडं असणार आहे. 21 एप्रिल रोजी मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस एवढा होतं. 22 एप्रिल रोजी देखील मुंबईचे तापमान हे असंच राहणार असून त्यामध्ये फारसा बदल होणार नाही.
पुण्यात तापमान 40 अंशांवर कायम
पुण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पुणेकर मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेने लाहीलाही झाल्याचे पाहायला मिळते. मागील दोन दिवसांपासून पुण्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वातावरणात थोडासा गारवा आला आहे. आणखी दोन दिवस पुण्यावर अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. तर पुण्यामध्ये 40°c एवढे कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे.
नागपुरात वादळी पावसाची शक्यता
नागपूरमध्ये मागील काही दिवसांपासून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पुढील काही दिवस देखील तापमान 40 अंशांच्या मागे पुढे असणार आहे. मात्र पुढील दोन दिवस हे नागपूरमध्ये अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. तसेच नागपूरसह विदर्भातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा तापलेलाच
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून तापमान 40 अंशांच्यावर गेले आहे. 21 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये 41 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. 22 एप्रिल रोजी एका अंशाने घट होऊन ते 40 अंशांवर येण्याची शक्यता आहे. संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये 21 आणि 22 एप्रिल रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.
कोल्हापूरकरांना दिलासा
कोल्हापूरमध्ये देखील पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. कोल्हापूरच्या तापमानामध्ये देखील घट झाल्याचे पाहायला मिळतेय. 21 एप्रिल रोजी 36 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामध्ये 22 एप्रिलला आणखी एक अंशाने वाढ होऊ शकते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. येथील तापमान 38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.