Crime News : पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर मृत सुनिता राऊत या सून वैशाली आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होत्या.
Crime News : सुनेने सुपारी देऊन सासूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सुनेने तिच्या चुलत भावांच्या मदतीने 2 लाखांत सासूच्या हत्येची सुपारी दिली होती. दोन्ही चुलत भावांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सुनिता राऊत (54 वर्ष) असे मृत सासूचे तर वैशाली राऊत (32 वर्ष) असं आरोपी सुनेचे नाव आहे. मृत सुनिता या वैशालीच्या चरित्रावर संशय घेत होत्या, तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर मृत सुनिता राऊत या सून वैशाली आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होत्या. 28 ऑगस्ट रोजी हार्ट अटॅकमुळे सुनिता यांचा मृत्यू झाल्याचा बनाव सून वैशालीने केला होता. त्याच दिवशी सुनीता राऊत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र सासू व सुनेत वाद झाला होता अशी चर्चा शेजारील लोकांमध्ये रंगली होती.
आरोपींना अटक
दरम्यान रात्री दोन मामा घरात आले होते व त्यांनी सुनीता यांना गळा दाबून मारले अशी माहिती वैशालीच्या पाच वर्षीय मुलीने काही नातेवाईकांसमोर दिली. त्यानंतर काही नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून सखोल चौकशीची मागणी केली. पोलिसांनी सखोल चौकशी करीत सून वैशाली तसेच तिचा भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल अटक केली आहे. वैशालीचे दोन्ही चुलत भाऊ मध्यप्रदेशातील पांढुरणा जवळील पांढरागोडी येथील राहणारे आहेत.