Bigg Boss Marathi : संग्राम अन् अरबाज पहिल्यांदाच थेट भिडणार! कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण मारणार बाजी? पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने एन्ट्री घेतली. त्याने घरात पाऊल टाकताच निक्की-अरबाजच्या विरोधात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. एवढंच नव्हे तर अरबाज-निक्कीला जादुई विहिरीत ढकलत संग्रामने या दोघांकडून आठवड्याभरातील सगळ्या सुखसुविधा काढून घेतल्या होत्या. यामुळे अरबाज-निक्की आणि घरातील अन्य काही सदस्यांनी लक्झरी प्रोडक्ट वापरण्यास ‘बिग बॉस’कडून मनाई करण्यात आली आहे. यावेळी निक्की तांबोळीने संग्रामला “माझ्या आधी तू या घरातून कसा जात नाहीस तेच मी बघते” असं दणकावून सांगितलं होतं.
घरात पहिल्या दिवशीच एकमेकांना आव्हान देणारे संग्राम आणि अरबाज आता कॅप्टन्सी कार्यात पहिल्यांदाच एकमेकांना भिडणार आहेत. याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात संग्राम-अरबाजमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी संग्रामने “मी संचालक असल्याने मीच निर्णय घेणार” असं अरबाजला ठामपणे सांगितलं होतं. त्यामुळे कॅप्टन्सी टास्कमध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.
कॅप्टन पदासाठी निक्की सोडून घरातील सगळे स्पर्धक दावेदार आहेत. रितेशने दिलेल्या शिक्षेमुळे निक्की इथून पुढे कधीच घराची कॅप्टन होऊ शकणार नाही. त्यामुळे स्वत:कडे उमेदवारी नसल्याने या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की तिचा जवळचा मित्र असलेल्या अरबाजसाठी खेळताना दिसेल हे जवळपास निश्चित आहे. आता घरात कॅप्टन्सीसाठी नेमका काय टास्क असेल जाणून घेऊयात…
कॅप्टन्सीच्या शर्यतीत ज्या लोकांना बाद करायचंय अशा सदस्यांची नावं ‘बिग बॉस’ने पाठवलेल्या छोट्या गोण्यांवर लिहून त्यात कापूस भरायचा आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. कारण, या टास्कमध्ये सगळेच एकमेकांना भिडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: या कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज-संग्राममध्ये जोरदार वाद होऊन दोघेही एकमेकांना भिडत असल्याचं स्पष्टपणे प्रोमोमध्ये दिसत आहे.
नेटकऱ्यांनी कॅप्टन्सी टास्कच्या ( Bigg Boss Marathi ) या प्रोमोवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी अरबाजच्या ताकदीचं कौतुक केलं आहे. तर, अनेकांनी संग्रामला साथ देत त्याच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरबाजने संग्रामला उचलून बाजूला केलंय दिसत आहे”, “संग्राम दादाने आज अरबाजला आपटला पाहिजे”, “संग्राम आणि अरबाज एकमेकांना कॅप्टन पदाच्या टास्कमध्ये चांगलेच भिडणार हे पाहायला मिळतंय”, “आज राडा होणार” अशा कमेंट्स युजर्सनी या प्रोमोवर केल्या आहेत.