पावसाळ्याच्या दिवसांत महापूरामुळे अनेक दुर्घटना घडत असतात. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी आणि पशुधनासह पाण्यात वाहून जातो. पुढे जे घडतं ते अत्यंत भयंकर. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
घटलेली घटना अशी की, यवतमाळ आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कोपेश्वर येथे ही घटना घडली आहे. शेतकरी दत्तात्रय समीर यांच्या शेतात काम करणारा सालगडी रामदास तोडसाम संध्याकाळी शेतीची कामे करुन घरी येत होता. अचानक शेत रस्त्यावर असलेल्या उमरी कोपेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला.
दुपारपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे बंद झाली होती. शेत शिवारातील सर्व शेतकरी, शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते. ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत होतं आणि संध्याकाळ झाली होती. त्यामुळे सालगडी रामदास तोडसाम यांनी आपली बैलगाडी पुराच्या पाण्यातून घालण्याचा निर्णय घेतला. मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि वासरू बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचे पाणी वाढले. गाडीमागे बांधून असलेली गाय व वासरू पाण्यात वाहून गेले.
मात्र पाण्यात कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या शिथापीने नदीचा काठ गाठला. तर बैलांनी देखील आपली सुटका करून घेतली. मात्र वाहून गेलेली गाय आणि वासरू यांचा मात्र दुरपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या घटनेतील सालगडी, बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले. मात्र गाडीमागे बांधून असलेली गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे.