Viral video : एका महिलेने फास्ट फूडबाबत तिचा अनुभव शेअर केला. तिचा अनुभव वाचल्यानंतर फास्ट फूड घेताना कदाचित तुम्ही दहा वेळा विचार कराल.
Viral video : मुंबईतील एका महिलेनं बर्गर किंगमध्ये बर्गर ऑर्डर केला. ती बर्गर खायला सुरुवात करणार, त्याआधी एक धक्कादायक गोष्ट तिच्या नजरेस पडली. बर्गर खाताना असं काही घडेल याची कल्पनादेखील त्या महिलेनं केली नव्हती. सध्याच्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूड हे जवळपास आपल्या खाद्यपदार्थांमधील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. या धावपळीच्या युगात लोक पोषक आहारापेक्षा पिझ्झा, बर्गरसारखे फास्ट फूड पदार्थ खाऊन आपले पोट भरत आहेत. बरं हे पदार्थ अनेकदा इतके वेगाने खाल्ले जातात की त्यामध्ये काय टाकलेलं असतं हे देखील कळत नाही. नुकताच एका महिलेने फास्ट फूडबाबत तिचा अनुभव शेअर केला. तिचा अनुभव वाचल्यानंतर फास्ट फूड घेताना कदाचित तुम्ही दहा वेळा विचार कराल.
या महिलेने असा दावा केला की, तिला बर्गर किंग या आउटलेटमधून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर बर्गरमध्ये मृत कीटक सापडला. या महिलेने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने बर्गरमधील कीटक तर दाखवलेच, पण बर्गरसाठी प्रसिद्ध असलेल्या आउटलेटवर तिनं तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत महिलेने कॅप्शन लिहिले आहे की, “आज माझ्या बर्गर किंग ऑर्डरमध्ये एक मेलेला कीटक सापडला @burgerkingindia हे तुमच्याकडून अपेक्षित नाहीये, जर बर्गर किंगसारखे मोठे ब्रँड त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेऊ शकत नाहीत तर मला आता कशावर अवलंबून राहावे हे कळत नाहीये”, अशी पोस्ट तिने केली आहे. पुढे ती म्हणते की, हे दुकान मुंबईत आहे आणि मी मागवलेल्या डबल पार्टी व्हेजी बर्गरमध्ये हा मृत कीटक मला आढला. यामुळे आपल्या सर्वांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, जे ब्रँड त्यांच्या फ्रँचायझीची काळजी घेऊ शकत नाहीत. @burgerkingindia ने यासंदर्भात माफी मागितली पाहिजे, अशीही तिनं मागणी केली आहे.
दरम्यान, ही एकच घटना नाही तर खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे कीटक आणि अगदी उंदीर आणि पाली यांच्या अलीकडील अहवालांमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अन्नातून विषबाधा आणि अस्वच्छ अन्नामुळे होणारे रोग, हा आरोग्यासाठी एक प्रमुख चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्यात अशा प्रकरणांमध्ये अनेकदा वाढ होते. यामुळे ऑनलाइन ऑर्डरच्या सुविधांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. घरापासून दूर राहणाऱ्या तरुणाईची संख्या मोठी असून ते सर्व ऑनलाइन फूडवर अवलंबून असतात, त्यामुळे ही बाब आणखी गंभीर बनते.