Rohini Nakshatra : पावसाचा अंदाज 9 नक्षत्रांवरुन बांधला जातो. रोहिणी नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते आणि त्यानंतर मृग नक्षत्रापासून पाऊस वाढत जातो.
Maharashtra Weather Forecast | Rohini Nakshatra : पंचांगशास्त्रातील नक्षत्रनिहाय हवामानाचा अंदाज बांधला जातो. हवामान अंदाजातील पहिलं पावसाचं नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र. या नक्षत्राला सुरुवात झाली आहे. शेतकरी नक्षत्रांच्या आधारेच पेरणी कामं करतात. नुकताच सोलापुरात रोहिणी नक्षत्राची (Rohini Nakshatra) बरसात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सूर्याने 24 मे रोजी मध्यरात्री 3 वाजून 16 मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला.
सोलापूर जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राने(Rohini Nakshatra) पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांत रोहिणी नक्षत्र महाराष्ट्र व्यापेल. सोलापूर जिल्ह्यात 91 पैकी 82 महसुली मंडळांत 5 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याचं दिसत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाला लवकरच सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन-चार मंडळं वगळता इतर मंडळांत पाऊस पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 102.5 मिमी पाऊस पडणं अपेक्षित आहे. तापर्यंत 30.7 मिमी पाऊस पडला असून जवळपास 30 टक्के इतका पाऊस 5 जूनपर्यंत पडला आहे.
सध्या तळकोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल.
वाहन उंदीर असल्याने ‘असा’ राहील पाऊस-काळ
नक्षत्रांवरुन हवामानाचा अंदाज वर्तवण्याची पंरपरा हजारो वर्षांपासूनची आहे. गणितशास्त्राचा आधार घेऊन प्रत्येक नक्षत्राची वाहनं ठरवली जातात. पावसाची 9 नक्षत्रं असतात आणि 9 वाहनं असतात. मान्सूनपूर्व पावसाचं रोहिणी नक्षत्र धरलं जातं. रोहिणी नक्षत्राचं(Rohini Nakshatra) वाहन उंदीर आहे, त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या काळात कमी पाऊस अपेक्षित आहे.
हत्ती, बेडुक आणि म्हैस या वाहनांना भरपूर पाऊस पडतो. मोर, कोल्हा आणि घोडा आल्यास मध्यम पाऊस पडतो. तर उंदीर, गाढव, मेंढा यांना कमी पाऊस पडतो. सध्या उंदीर हे कमी पावसाचं वाहन सुरू आहे.
परंपरागतरित्या या नक्षत्रावर धूळ पेरणी करू नये, असा सल्ला शेतकर्यांना देण्यात आलेला आहे. जमिनीला पुरेशी ओल आल्याशिवाय पेरण्या करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एखादा पाऊस पडला, की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. किमान एक हितभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी, असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात मान्सून आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीकामांना वेग द्यावा लागणार आहे.