मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे, ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र दुसरीकडे शहापूरमधील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जेसीबीनं फुलांची उधळण करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात शहापूर तालुक्यातून करण्यात आली, यावेळी म्हात्रे यांची शहापूर शहरात एन्ट्री होताच मनसेचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यासह तब्बल 300 कार्यकर्त्यांनी म्हात्रे यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचं जोरदार स्वागत केलं. आम्ही जरी मनसेचे कार्यकर्ते असलो तरी देखील आम्ही सुरेश म्हात्रे यांचे समर्थक आहोत. त्यामुळे आमचा पाठिंबा म्हात्रे यांनाच असणार आहे, असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे देखील महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं, अखेर गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली. महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे मनसेचे काही कार्यकर्ते नारज असल्याचं बोललं जात आहे.