गेल्या काही दिवसांपासून अन्नपाण्यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील एका प्रसिद्ध अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यापूर्वी शिर्डीतील एका लग्नातील जेवणातून वऱ्हाडींना त्रास झाला होता. अशात आता आणखी एक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जनावरांना विधबाधा झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
सोयगाव तालुक्यातील तिडका गावात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी भरलेल्या हौदातील पाण्यातून गावातील 60 ते 70 लहान मोठ्या जनावरांना विषबाधा झाली असून, आतापर्यंत 20 जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकी विषबाधा झालेल्या जनावरांवर वैद्यकीय उपचार सुरू असून सोयगाव तालुक्यात वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेने तिडका गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे. गावातील एखाद्या माथेफिरूने पाण्याच्या हौदामध्ये युरिया टाकला असल्याचा संशय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात येत आहे. आरोग्य विभागाने हौदातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले असून अहवाल समोर आल्यानंतर या घटनेत स्पष्टता समोर येईल.