सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे.
कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाची संततधार कायम आहे. त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. कृष्णेची पातळी 37 फुटांवर पोहचली आहे. नदीची इशारा पातळी 40 फूट तर धोक्याची पातळी 45 फूट आहे. पाण्याची पातळी वाढत असून शेरीनाल्याच्या माध्यमातून आता कृष्णेचे पाणी शहरातील सखल भागात शिरू लागले आहे.
कर्नाळ रोडवरील पुल आता पाण्याखाली गेला आहे,त्यामुळे नांद्रे-पलूसकडे जाणारी वाहतूक अन्यमार्गाने वळवण्यात आली आहे.तसेच काकानगर परिसरातील नागरिकांनी आता स्थलांतर सुरू केले आहे. सांगलीतील कृष्णा नदीत पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही काही हौशी तरुणांनी सांगलीच्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली.
सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगलीच अंगलट आली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत निघाले होते. सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोल ला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला. थंड पाणी, मोठा प्रवाह यामुळे या तरुणांना काही कळत नव्हते. सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदी झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला. हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.