विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून, अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे. दरम्यान आज देखील ते शरद पवार यांना भेटणार आहेत. या भेटीनंतर दुर्रानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Ladaki bahin yojana : लाडक्या बहिणींची ‘कटकट’ मिटली, सरकारचा नवा GR; आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार
‘मी आधीपासूनच शरद पवारांच्या विचारांना मानणारा आहे, त्यांच्यासोबत काम केलं आहे. विचारांचा फरक पडला की काम करायला अवघड जाते, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिली आहे. दुर्रानी हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा देखील आहे, त्यामुळे आता ते लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेश ही आता फक्त औपचारिकता आहे, असंही दुर्रानी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान याआधी बाबाजानी दुराणी यांनी जयंत पाटलांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच ते पुन्हा एकदा स्वगृही परततील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. बाबाजानी दुराणी सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आहेत. काहीच दिवसांमध्ये त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळही संपनार आहे, त्यामुळे आता ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.