Nashik News : अभिजत सांबरेचा मृतदेह २८ जून २०२३ ला आढळला होता. तर त्याच्या मृत्यू प्रकरणी प्रमोद जालिंदर रणमाळे याला ताब्यात घेतलंय.
Nashik News : नाशिकमधील सिडको इथं राहणाऱ्या तरुणाच्या मृत्यूचं गूढ तब्बल १४ महिन्यांनी उलगडलंय. मित्रानेच दारू पाजून त्याचा घात केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दारूमध्ये ब्लडप्रेशर आणि झोपेच्या गोळ्या मिसळून मित्राची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. अभिजत सांबरेचा मृतदेह २८ जून २०२३ ला आढळला होता. तर त्याच्या मृत्यू प्रकरणी प्रमोद जालिंदर रणमाळे याला ताब्यात घेतलंय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभिजीत राजेंद्र सांबरे याचा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी तेव्हा अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबियांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. पोलीस त्या दृष्टीने तपास करत होते.
अभिजित आणि प्रमोद हे मित्र होते. रणमाळे यानं अभिजित हा कामासाठी येवल्याला जाणार असल्याचं समजताच त्याला संपर्क केला होता. तेव्हा कोपरगावला भेटून जाऊ असं दोघांचं ठरलं. अभिजित आणि प्रमोद दोघेही दारू प्यायले. तेव्हा दारूत प्रमोद रणमाळेने गोळ्या मिसळल्या. त्यानंतर रणमाळे हा अभिजितला घेऊन कोपरगाव रस्त्याने येत होता. दुचाकीवरून परतताना अभिजितची प्रकृती गंभीर होताच त्याला रस्त्याच्या कडेला तसंच फेकून दिलं. त्यानंतर प्रमोद रणमाळे हा पसार झाला होता.
प्रमोद आणि अभिजित हे दोघेही मित्र होते आणि त्यांच्यात आर्थिक कारणातून वाद होते. याच वादातून प्रमोदने अभिजितचा काटा काढायचं ठरवलं. यानंतरच त्याने अभिजितशी संपर्क साधून त्याला दारू पाजली. औषधांच्या गोळ्यांमुळे अभिजित बेशुद्ध झाला होता. त्याला तशाच अवस्थेत प्रमोदने रस्त्याकडेच्या झाडीत टाकलं होतं.