मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पाचव्यांदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. पण, यावेळी त्यांनी सरकारविरोधात थेट एल्गार केल्याचं पाहायला मिळतंय. यातच ओबीसींनी देखील जालन्यातून जनआक्रोश यात्रा सुरू केल्याने पुन्हा एकदा जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. जरांगेंनी थेट येवल्यात आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध ओबीसी असा सामना रंगल्याचं दिसतंय.
मनोज जरांगेंनी उपोषणाच्या पहिल्या दोन दिवसात भाजपच्या आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकरांना लक्ष्य केल्यानंतर, जरांगेंनी आता त्यांच्या तोफेचं तोंड पुन्हा एकदा भुजबळांकडे वळवल्याचं दिसतंय. त्याचवेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी जनआक्रोश यात्रा काढत पुन्हा एकदा जरांगेंसमोर थेट आव्हान उभं केलं. या आंदोलनानंतर जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य करत, भुजबळांच्या येवल्यातच आंदोलन करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिला.
मी कधीही आंदोलन येवल्याला हलवू शकतो, भुजबळ माझ्याकडे आंदोलने करायला लावत आहेत. मग मी कधीही येवल्याला आंदोलन करू शकतो, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
व्यायाम करतानाच जमिनीवर कोसळले, संभाजीनगरच्या उद्योजकाला हृदयविकराचा धक्का, मृत्यूचा Live Video
सध्या अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या जरांगेंनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला, यावेळी त्यांनी सरकारच्या दुर्लक्षावर निशाणा साधला. सरकार भुजबळांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत, जरांगेंनी हाकेंच्या ओबीसी जनआक्रोश यात्रेवरुनही भुजबळांना लक्ष्य केलं.
लक्ष्मण हाके यांची ओबीसी यात्रा ही छगन भुजबळ यांनीच सांगितलेली आहे. भुजबळ शिवाय यांचं पानही हलत नाही. छगन भुजबळ राज्यात दंगली घडवणार आहेत. शंभर टक्के दंगल होईल. आमचे आंदोलन आहे तिकडेच भुजबळ आंदोलने करायला लावतात, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळ आणि ओबीसी आंदोलनाला लक्ष्य केल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेही समोर आले. हाकेंनी जरांगेंचे आरोप फेटाळत जोरदार पलटवार केला. मनोज जरांगेंना कुणाचा पाठिंबा आहे? असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी विचारला आहे, तर कुणाला टार्गेट करण्यासाठी आंदोलन नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
मनोज जरांगेंनी पाचव्यांदा उपोषण सुरू करत, सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला खरा. पण, त्याचवेळी आता ओबीसींनी देखील मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात जनआक्रोश यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे आरक्षणावरुन पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके संघर्ष तापण्याची शक्यता आहे. यात सरकार नेमकी काय भूमिका घेतं? जरांगेंचं उपोषण आणि हाकेंच्या यात्रा यात पुढे काय काय घडतं? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.