Mahayuti : महायुतीमध्ये 41 मतदारसंघात वाद होण्याची शक्यता आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत.
Mahayuti : महायुतीमध्ये जवळपास 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत. याच आठवड्यात राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन वादातीत मतदारसंघाबाबतचा निर्णय सामोचाराने सोडवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. अमित शाहा यांनी पुढील दहा दिवसात अंतिम चर्चेबाबत दिल्लीला येण्याबाबत महायुतीतील नेत्यांना सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपमधून अनेकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये शरद पवारांच्या विरोधात भूमिका गेत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महायुतीमध्ये आणखी एका पक्षाची वाढ झाली. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला तरी स्थानिक पातळीवर महायुती म्हणून निवडणूक लढवताना अनेक अडचणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी मिळणार असं जाणवल्यानंतर अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतत आहेत. शिवाय भाजपमधूनही अनेकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय.
इंदापूरमध्ये महायुतीमध्ये वाद, हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार?
महायुतीमध्ये सीटींग आमदार ज्याचा असेल, त्या पक्षाला जागा सोडली जाईल, असा फॉर्म्युला ठेवण्यात आलाय. त्यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वत:ची उमेदवारी घोषित करुन टाकली आहे. मात्र, भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनकडून अपक्ष लढण्याची किंवा तुतारी हाती घेण्याची भाषा बोलली जात आहे. तर दुसरीकडे कागलमध्ये हसन मुश्रीफांना उमेदवारी मिळणार असल्याने भाजपात असलेल्या समरजीत घाटगेंनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीतील पक्षांमधील अनेक नेते पक्षांतर करतील किंवा बंडखोरी करतील, असे बोलले जात आहे.