Maharashtra Weather – उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णता प्रचंड वाढली असून दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.(Maharashtra Weather)
Maharashtra Weather – मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका तर काही जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट अशी स्थिती पाहायला मिळतेय. राज्यातील मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णता प्रचंड वाढली असून दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. गेल्या 24 तासात अकोला येथे सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी 22 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान धाराशिव येथे नोंदवण्यात आलं.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 27 मे रोजी राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान आणि हवामानाबाबत अपडेट जाणून घेऊ.
मुंबईत पावसाची शक्यता
मुंबईमध्ये पुढील चार ते पाच दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 27 मे रोजी कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश एवढे राहू शकते. तब्बल 40 अंशांच्या वर गेलेला पुणे शहराचा पारा आता खाली आला असून 27 मे रोजी पुण्यात 36 अंश कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान राहू शकतं. तर 30, 31 मे आणि 1 जून रोजी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने कोल्हापूर मधील उष्णतेच्या पाऱ्यात देखील घट झाली आहे. 27 मे रोजी कोल्हापूरमध्ये 33 अंश सेल्सिअस कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात सूर्य ओकतोय आग
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून तापमान 42 ते 43 अंशापर्यंत पोहोचलं आहे. 26 मे रोजी छत्रपती संभाजी नगरमध्ये 43 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. 27 मे रोजी मात्र कमाल तापमानात 3 अंशांनी घट होऊन ते 40 अंशांवर राहू शकतं. पुढील 7 ते 8 दिवस छत्रपती संभाजीनगरकरांना वाढत्या तापमानापासून सुटका मिळणार नाही.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा कहर
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव येथे उष्णता सातत्याने वाढत असताना नाशिकमधील तापमानाचा पारा मात्र खाली आला आहे. 27 मे रोजी नाशिक मध्ये 36 अंश कमाल तर 25 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिलं. विदर्भातील नागपूरमध्ये पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहणार असून उष्णतेचा पारा मात्र चढलेला असणार आहे. नागपूर मध्ये 26 मे रोजी 43 अंश कमाल तर 29 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 27 मे रोजी देखील नागपूरमधील तापमानाची हीच स्थिती असणार आहे.
6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
एकंदरीत राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि प्रचंड तापमान अशी स्थिती पाहायला मिळत आहे. एकाच विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 27 मे रोजी धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.