Gold-Silver Rates : जगभरातील घडामोडींचा परिणाम सराफ बाजारावर झाला असून, सराफा बाजारपेठेत सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Gold-Silver Rates : जगभरातील घडामोडींचा परिणाम सराफ बाजारावर झाला असून, जळगाव येथील सराफ बाजारपेठेत सोमवारी सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सोन्याचे दर तोळ्या मागे तब्बल 1 हजार 239 रुपयांनी, तर चांदीचे दर किलोमागे 3 हजार 693 रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता जाणवत आहे.
सीमाशुल्क कपातीच्या घोषणेनंतर सोने-चांदीचे दर आधीच मोठ्या प्रमाणात खाली आले होते. त्यानंतर काही प्रमाणात दर वाढले होते, पण दोन दिवसांच्या सुटीनंतर बाजार उघडताच दरात मोठी घसरण झाली आहे.
नव्या दरानुसार सोन्याचे दर प्रति तोळा 69 हजार 600 रुपये तर चांदीचा दर प्रति किलो 82 हजार रुपये इतके आहेत, दोन दिवसांपूर्वी भावात वाढ झाली होती, मात्र आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता, इराण व इस्रायल युद्ध भडकण्याची भीती आणि बांगलादेशातील घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून येत असून सराफा बाजारात घसरण सुरूच आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर काही प्रमाणात वाढले होते, मात्र शनिवार आणि रविवार अशा दोन सलग सुट्ट्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
सध्या सराफा मार्केट अस्थिर असल्यामुळे सर्व शक्यतेचा विचार करूनच सावधानपूर्वक सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.