अनोळखी एक दिवसाच्या भुकेली असलेल्या चिमुकलीला कोणतीही पर्वा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी स्वतःचे दूध पाजले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. या प्रकारामुळे पोलीस पोलीस खात्याची प्रतिमा सुद्धा उंचावली आहे. तसेच खाकीमधली ‘ममता’ देखील सर्वांसमोर आली आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिदवाक्य घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलीस चांगल्या लोकांचे वाईट लोकांपासून संरक्षण करतात. त्यासाठी वेळप्रसंग कठोर होतात. परंतु त्या पोलिसांमध्ये एक माणूस असतो. त्यांना मानवी भावना असतात. मग भूकेमुळे रडणारे बाळ दिसल्यावर कोणत्याही महिलेची ममता जागृत होते. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्यानंतर पोलीस कर्मचारी मातेची ममता व्याकूळ झाली. तिने त्या भुकेल्या बाळाला प्रेमाने जवळ घेतले. त्याला दूध पाजले. त्यानंतर ते निरागस बाळ शांत झाले आणि त्या महिला पोलीस मातेच्या मनाला शांती मिळाली. बुलढाणा येथील पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.
काय आहे तो प्रकार
बुलढाण्यातील लोणार येथील अनाथ आश्रमात एका दिवसाच्या बाळाला घेऊन एक महिला आली. ते बाळ एक वेडसर महिलेचे असून त्याला अनाथ आश्रमात दाखल करुन घेण्याची विनंती त्या महिलेने केली. परंतु आधी तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन त्याची नोंद करा, त्यानंतर पोलीस सांगतील त्या पद्धतीने कारवाई करु, असे अनाथ आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस सांगितले. त्यानंतर ती महिला बुलढाणा शहर पोलिसात तक्रार बाळासह पोहचली. ही चिमुकली एका वेड्या बाईची असल्याची सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आपण गेलो होतो, परंतु त्यांनी पोलिसांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचे त्या महिलेने पोलिसांसमोर कथन केले. सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली माझ्याकडे आहे. ती उपाशी आहे. भूकेने व्याकुळ होऊन रडत आहे.
मातेची ममता झाली जागृत
बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेली महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी त्या चिमुकल्या एका दिवसाच्या मुलीस रडताना पाहिले. त्या स्वत: दिड वर्षाच्या मुलाची आई आहेत. त्यामुळे त्यांची ‘ममता’ जागृत झाली. त्यांनी लगेच सर्वांची परवानगी घेऊन त्या बाळाला स्वतःचे दूध पाजून शांत केले.
या प्रकाराबद्दल योगिता डुकरे यांनी सांगितले की, ते बाळ खूप रडत होते. बाळाला जवळ घेतले. मलाही दीड वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे ते बाळ भूकेने रडत असल्याचे मला लगेच लक्षात आले. यामुळे ज्या लोकांनी ते बाळ आणले त्यांची आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या बाळाला माझे दूध पाजले. त्यानंतर ते बाळ शांत झाले. हा खूप वेगळा अनुभव होतो. तो अनुभव शब्दांत सांगू शकत नाही, असे महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी सांगितले.
बाळाला केले जिल्हा रुग्णालयात दाखल
चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्या मुलीची प्रकृती चांगली आहे. तिचे वजन कमी असल्यामुळे तिला तीन आठवड्यापर्यंत रुग्णालयातच ठेवून उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे..
एकंदरीत अनोळखी एक दिवसाच्या भुकेली असलेल्या चिमुकलीला कोणतीही पर्वा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी स्वतःचे दूध पाजले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतूक होत आहे. या प्रकारामुळे पोलीस पोलीस खात्याची प्रतिमा सुद्धा उंचावली आहे. तसेच खाकीमधली ‘ममता’ देखील सर्वांसमोर आली आहे.