Crime News : चोरट्यांनी पोलिसाचा मोबाइल लंपास करुन यूपीआयद्वारे लाखाचा ऑनलाईन व्यवहार केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : आठवडे बाजारात भाजी खरेदी करणे एका पोलीस (Police) कर्मचाऱ्यालाच चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी पोलिसाचा मोबाइल लंपास करुन त्यातील यूपीआयद्वारे (UPI) 99 हजार दुसऱ्या बँकेत वळते केले. त्यानंतर 960 रुपयांची खरेदी केल्याची बाब उघड झाली आहे. सुमारे एक लाखांची फसवणूक झाल्याने संबंधित पोलिसाने देवळाली कॅम्प पोलिसात (Deolali Camp Police Station) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली कॅम्प पोलीस वसाहतीतील रहिवाशी दिपक सखाराम सरकटे (38) हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला खरेदी करीत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांचा दहा हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला.
एक लाखाची फसवणूक
त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास ‘यूपीआय’द्वारे कोलकाता येथील स्टेट बँकेच्या एका खात्यात 99 हजार रुपये संशयिताने वळते केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 960 रुपये ऑनलाइन खर्च केले. हा प्रकार लक्षात येताच सरकटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकांकडे तपास देण्यात आला आहे.