Crime News : प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे.
Crime News : प्रेमप्रकरणातील वादात प्रियकराविरुद्ध तक्रार करायला गेलेल्या एका तरुणीला चक्क वरिष्ठ पोलीस अधिकार्यानेच शरीर सुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. हा खळबळजनक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara)घडला असून तक्रारदार तरुणीच्या तक्रारीनंतर भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीसाठी गेल्यावर डॉ. अशोक बागुल यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला आहे आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांच्या विरोधात रात्री उशिरा भंडारा पोलिसात (Bhandara Police) भादंवी कलम 354 A (2), 509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळं पोलीस प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सध्या सुरू आहे.
या प्रकरणातील 25 वर्षीय तक्रारकर्त्या पीडित तरुणी ही भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील असून ती उच्च शिक्षित (इलेक्ट्रिक इंजिनियर) आहे. नागपूरला शिक्षण घेत असताना त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या गडचिरोली येथील एका तरूणासोबत प्रेम संबंध जूळले. सात वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्यानं तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाचा विषय काढल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याची तक्रार दाखल करण्याकरिता पीडित तरुणी ही 1 जूनला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांच्या कार्यालयात गेली होती.
दरम्यान, केबिनमध्ये पीडितेला बसवून, तू सुंदर आहे. तू आत्महत्या करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला मदत करतो. पण माझी एक अट आहे. तू आणि मी एकदम क्लोज फ्रेंड बनू. तुझं आयुष्य बदलवून टाकेन. तू सुशिक्षित आणि सुंदर आहे. मी अजूनही तरुण आहे. आपण डेट वर जावू. तू मला त्यासाठी मदत करं. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. माझ्या वयावर जावू नकोस. मी तुला आयुष्यभर सांभाळतो. हे तू कोणाला सांगू नकोस. अशी भावना 56 वर्षीय डॉ. अशोक बागुल यांनी पीडितेजवळ व्यक्त केल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे.
तर प्रियकराच्या विरोधात तक्रार करायला गेलेल्या पीडितेच्या सहायतेचा गैरफायदा डॉ. बागुल घेत असल्याचं लक्षात आल्यानं आणि मनात लज्जा उत्पन्न झाल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बागुल यांच्या विरोधात भंडारा पोलीसात दाखल केलेल्या पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी 354 A (2), 509 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतं हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.