Crime News : पुण्यातील हडपसर भागात एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या मॅनेजरचं नाव आहे.
Crime News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. रविवारी रात्री नाना पेठेत ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच पुण्यातील हडपसर भागात एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या मॅनेजरचं नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासुदेव कुलकर्णी हे एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. रविवारी रात्री घरासमोरच वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. वासुदेव कुलकर्णी यांच्यावर हल्ल्यामुळे हडपसरसह पुण्यात पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झालंय.
वासुदेव कुलकर्णी यांच्यावर हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची नोंद केली असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
वनराज आंदेकर यांची हत्या का झाली?
उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं, त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती, वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे.
वनराज आंदेकर कोण?
2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.