सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे : पुण्यातील गुन्हेगारी घटना वाढल्या असून गेल्या तीन दिवसात तीन खून झाले आहेत. यातच आता सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मे महिन्यात पुण्यात डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून वाद झाला होता. तेव्हा एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे त्या तरुणाचे नाव होते. तरुणावर हल्ला करणाऱ्यांपैकी सागर चव्हाण हा एक होता.
सागर चव्हाण याने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे. सागर पुण्यातल्या किरकटवाडी भागात आला होता. एका मित्राने त्याला बोलावल्याने तो किरकटवाडी इथं आला होता. तेव्हा अचानक त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्याच्यावर अनेक वार करण्यात आले.
भररस्त्यात त्याचा पाठलाग करण्यात आला. कोयता घेऊन हल्लेखोर त्याच्या मागे लागले होते. कोयत्याचा वार लागल्यानंतर तो रस्त्यात पडला. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर सलग वार केले. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानाही त्याच्यावर वार केले गेले. जखमी असलेल्या सागरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना समोर आल्या. हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर आता आणखी एक हत्या झाली आहे. गुलटेकडी परिसरात मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आलीय. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींनी ही हत्या केलीय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.