हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या छेडछाडीला आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या छेडछाडीला आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील प्रसिद्ध इंजीनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 7 मार्च रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका बालाजी साळुंके (वय 19) असं या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. या प्रकरणी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी तरुणी मुस्कान सिद्धू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका ही पुण्यात एका इंजीनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. होस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला अश्लील मेसेज पाठवायचा.
नेमकं प्रकरण काय?
दाखल तक्रारीनुसार मृत विद्यार्थिनी ही बालाजी साळुंखे यांची मुलगी आहे. ती भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होती. याच वसतीगृहात काम करणारा सतिश जाधव नावाचा कर्मचारी रेणुकाला ‘आय लव्ह यू’ म्हणजेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, अशा प्रकारचे मेसेज सतत पाठवायचा. मृत विद्यार्थिनी समोर दिसताच ‘तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले,’ असे म्हणत सतिश तिला त्रास द्यायचा. या प्रकारामुळे रेणूका घाबरली होती. यासह तिच्या खोलीत राहणारी मुस्कान सिद्धू नावाची मुलगीही तिला अभ्यास करू देत नव्हती. ती सतत खोलीचे लाईट्स बंद करायची.
या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने अखेर वसतीगृहातील स्वच्छतागृहात ७ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले होते. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे.