Crime News : भाग्यनगर पोलीस ठाण्यात 55 वर्षीय आरोपी नागेश जाधव याच्या विरोधात पोस्को आणि ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
Crime News : मागच्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींसोबत अत्याचार आणि अश्लील कृत्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना पुन्हा एकदा नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलील्या मुलीचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून पालक खासगी कोचिंग क्लासवर विश्वास ठेवून तिथे शिकायला पाठवतात. कोचिंग क्लासमध्ये गंदी बात सारख्या घटना घडल्याने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि समाजिक कार्यकर्त्यांनी त्या क्लासमध्ये घुसून तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पालक मोठ्या विश्वासाने खासगी क्लासला पाठवतात. मात्र तिथे असे प्रकार आणि अश्लील वर्तन होत असल्याचा निषेध व्यक्त केला आहे. बदलापूर, पुणे, लातूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असताना आता खासगी क्लासमध्येही असे प्रकार घडत असल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
कोचिंग क्लासमधील शिक्षकांना जाब विचारात नागरिकांनी कोचिंग क्लासेसची तोडफोड केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षक नागेश जाधव या शिक्षकाने कोपऱ्यात बोलावलं आणि विनयभंग केला असा आरोप पीडितेनं केला.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर भाग्यनगर पोलीस ठाण्यात 55 वर्षीय आरोपी नागेश जाधव याच्या विरोधात पोस्को आणि ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नव्या कलमानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.