Porsche Car अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर एका व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारनं(Porsche Car) दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या घटेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही पोर्शे कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या घटनेनंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत दरम्यान या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.
आता अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. विशाल अग्रवाल आणि मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर एका व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत असलेल्या अग्रवाल अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.