पुण्यातला 22 वर्षांचा प्रणव कराड हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता. सिंगापूर ते इंडोनेशीया दरम्यान प्रवास करताना तो बेपत्ता झाला आहे. प्रणव जिथे काम करायचा त्या विलहेल्म्सन कंपनीने, त्याच्या पालकांना फोन करुन तो बेपत्ता झाल्याचे कळवले आहे.
पुण्यातला 22 वर्षांचा प्रणव कराड हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता. सिंगापूर ते इंडोनेशीया दरम्यान प्रवास करताना तो बेपत्ता झाला आहे. प्रणव जिथे काम करायचा त्या विलहेल्म्सन कंपनीने, त्याच्या पालकांना फोन करुन तो बेपत्ता झाल्याचे कळवले आहे. त्यानंतर मात्र कंपनीकडून आपल्याला काहीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.कंपनीने मात्र शोधकार्य सुरू असून आपण त्याला शोधण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न करत असल्याचे म्हणले आहे.
प्रणवने पुण्यातल्या एमआयटीच्या महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंगमधून नॉटिकल सायन्स मध्ये पदवी मिळवली होती.एमआयटी मधून पदवी मिळाल्यानंतर प्रणव हा मर्चंट नेव्ही मध्ये दाखल झाला. पदवी प्राप्त झाल्यानंतर त्याला विलहेल्मसन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीकडून नोकरीची संधी मिळाली.सुरुवातीला अमेरिकेला आणि त्यानंतर रिझॉल्व्ह व्हेसल 2 या गॅसचा ट्रान्स्पोर्ट करणाऱ्या जहाजावर तो डेक कॅडेट म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून काम करत होता.
नुकताच त्याने ऑस्ट्रेलियाचा दौरा पूर्ण केला होता आणि त्यानंतर तो सिंगापूर मार्गे इंडोनेशियाला जात असताना बेपत्ता झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.त्याचे वडील गोपाळ कराड म्हणाले, “माझा मुलगा गेल्या 6 महिन्यांपासून मर्चंट नेव्हीत होता. परवा 5 तारखेला कंपनीचा फोन आला की मुलगा मिसिंग झाला आहे. तर मला त्यानंतर काही सहकार्य मिळत नाही.”प्रणव जवळपास दररोज आपल्या पालकांच्या संपर्कात असायचा. त्याचा प्रवास तसंच तो काय करतो आहे याबाबत तो सातत्याने आपल्याला कळवायचा असं त्याच्या पालकांचे म्हणणं आहे.
नोकरीला लागल्यापासून तो घरची आर्थिक जबाबदारी देखील उचलत होता. नुकतेच त्याने त्याच्या दहावीत असलेल्या बहिणीच्या शिक्षणासाठी 40 हजार आणि कुटुंबीयांचे देणे देण्यासाठी 1 लाख रुपयेही घरी पाठवले होते. तो बेपत्ता होण्याच्या आधी सकाळी देखील त्याच्याशी संपर्क झाल्याचं कुुटुंबीयांचं म्हणणं आहे.प्रणवची आई सविता कराड म्हणाल्या, “रविवारी आमचं शेवटचं बोलणं झालं. तो नेहमी व्हीडिओ कॅाल करुन अर्धा अर्धा तास बोलायचा. सगळं दाखवायचा.”मंगळवारी त्याचा पुन्हा फोन आला होता आणि बुधवारी सकाळी देखील बहिणीशी बोलला होता. पण त्याची कंपनी आता तो तणावात होता का, असं आम्हांला विचारत आहे. तो कामावरच होता.”तिथूनच गायब झालाय. कंपनी काय करतेय? आम्हालाच विचारत आहेत.
“मला माझा मुलगा आणून द्या. त्यांनीच आमचा मुलगा आणून द्यायचा आहे. नाहीतर मी कंपनीच्या दारात जाईन. तो नाष्टा करायला गेला त्यानंतर परत आलाच नाही,” प्रणवची आई सांगते.दरम्यान आता विलहेल्मसन शिपिंगकडून आपल्याला काहीच सहकार्य होत नसल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे.त्याच्या सोबत एकूण 21 जण या जहाजावर होते. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर तो काही तणावात नव्हता, असं ते सांगत आहेत असंही कुटुंबीय म्हणाले.
या 21 जणांपैकी एकटा प्रणवच कसा गायब झाला असाही प्रश्न ते विचारत आहेत. कंपनीच्या भारताच्या कार्यालयात संपर्क केल्यानंतरही त्यांच्याकडूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रणवचे वडील गोपाळ कराड बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.वारंवार कंपनीच्या कार्यालयात फोन करुन प्रतिसाद न मिळाल्याने ते कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात दाखल झाले. मात्र त्यानंतरही शोधकार्य सुरू असल्याच्या पलीकडे आपल्याला काहीच उत्तर दिलं जात नसल्याचे त्यांचे म्हणणं आहे.गोपाळ कराड म्हणाले, “त्याला 6 महिने झाले जॉईन होऊन. एकूण 21 जण कामाला होते. त्यातला एकच जण मिसींग झाला आहे. मित्र वगैरे सगळ्यांचे कॅाल आले आहेत. त्याच्या बरोबर गेलेत त्यांचे. कंपनी काहीच प्रतिसाद देत नाही. तेच ते सांगत आहेत. सरकारने आम्हांला सहकार्य करावं.”
धनंजय मुंडे यांचं ट्वीट
दरम्यान प्रणवचे कुटुंबीय मुळचे बीडचे असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी देखील संपर्क केला आहे.धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्वीट करुन परराष्ट्र मंत्रालयाने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
“माझ्या परळी मतदारसंघातील प्रणव कराड हा युवक विलहेम्सन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत डेक कॅडेट म्हणून कार्यरत असून, तो शुक्रवारच्या दरम्यान इंडोनेशिया ते सिंगापूर दरम्यान जहाजावर असताना बेपत्ता झाला आहे.प्रणवला शोधून सुखरूप घरी परत आणण्यासाठी मदत व्हावी” अशी मागणी ट्वीट द्वारे मुंडे यांनी केली आहे.