पुण्यातील एका तरुणाची अमेरिकेतील जहाज कंपनीत निवड झाली होती. तो जहाजावर रुजूही झाला. पण अमेरिकेत गेल्या ३ दिवसांपासून तो बेपत्ता आहे.
पुण्यातील एका तरुणाची अमेरिकेतील जहाज कंपनीत निवड झाली होती. तो जहाजावर रुजूही झाला. पण अमेरिकेत गेल्या ३ दिवसांपासून तो बेपत्ता आहे. कंपनीकडूनच मुलगा बेपत्ता झाल्याचं कळवल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याचा शोध घेतला जात असून या प्रकरणी पालकांनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचं प्रणव गोपाळ कराड असं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा. गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केलाय. प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे.
माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाहीये. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमची शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, असंही प्रणवचे वडील म्हणाले.
प्रणव ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीची स्थापना १८६१ मध्ये झाली आहे. कंपनीकडून जहाजांना क्रू आणि तांत्रिक व्यवस्थापन पुरवण्याचं काम केलं जातं. या कंपनीचे ६० देशांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. कंपनीकडून प्रणव बेपत्ता झाल्याचा मेल ६ एप्रिल रोजी आला. त्यानंतर त्याच्याबाबत इतर कोणतीही माहिती दिली जात नसल्याने कुटुंबिय काळजीत पडले आहे. मुलाचा शोध लवकरात लवकर घेतला जावा यासाठी पालकांनी पोलिसात धाव घेतलीय.