छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएसच्या विद्यार्थीनीनं आत्महत्या केली आहे. आरोपीचं तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं, यातूनच तो तिला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या त्रासाला कंटाळून तरुणीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या
द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यानंतर दोन तासांत आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे, तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे. गायत्री ही शहरातील फोस्टर महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती. गावात असताना गायत्रीचे आरोपीसोबत काहीवेळा बोलणे झाले होते. मात्र, शहरात आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाइलवर सतत फोन करून त्रास देत होता आणि भेटण्यासाठी बोलावत होता.
गायत्रीने याविषयी तिच्या मावशीकडे तक्रार केली. मावशीने गावी जानेफळमध्ये आरोपीला भेटून गायत्रीला फोन करून त्रास देऊ नकोस, असे समजावून सांगितले होते. त्यानंतरही त्याचा त्रास देणे थांबले नव्हते. तो तिला लॉजवर व इतर ठिकाणी भेटण्यासाठी बोलावत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने 25 जुलै रोजी दुपारी वसतिगृहातील सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.