ऑनड्युटी असलेले कमलाकर भोईर यांचा रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली
मुरबाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे एका ऑनड्युटी वायरमनला जीव गमवावा लागला आहे. ऑनड्युटी असलेले कमलाकर भोईर यांचा रोड लाईट चालू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
मुरबाड नगरपंचायतमध्ये 53 वर्षीय वायरमन कमलाकर भोईर हे कार्यरत होते. याच नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोलवरील बंद पडलेली लाईट चालू करण्यासाठी ते चढले होते. मात्र, यावेळी बंद केलेला वीज प्रवाह अचानक चालू झाला. अशात पोलवर चढलेले वायरमन कमलाकर भोईर यांना लाईटचा जोरदार शॉक लागला. यानंतर काही क्षणातच ते पोलवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सीसीटीव्ही ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. यात दिसतं की कमलाकर भोईर विजेच्या पोलवर चढले आहेत. अचानकच ते क्षणभरात खाली कोसळतात आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर आसपास असणारे लोक धावत त्यांच्या मदतीसाठी येतात. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
खरं तर MSEB च्या या भोंगळ कारभारामुळे एका वायरमनचा बळी गेला आहे. त्याला महावितरण जेवढं जबाबदार आहे तेवढीच जबाबदार मुरबाड नगरपंचायत सुद्धा आहे. पावसामध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे अशा निष्पाप कर्मचाऱ्यांचे बळी जात आहेत.