पुण्यातील हडपसरमध्ये औषध उधार देण्यास नकार दिल्याने एका मेडिकल दुकानदारावर वार करण्यात आले आहेत.
पुण्यातील हडपसर परिसरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. फुरसुंगी येथील मेडिकलच्या दुकानात घुसून दुकानदाराला चाकूने हातावर, डोक्यावर सपासप वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमीला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव येऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज सुदाम आडागळे ( वय ४० खंडोबा माळ फुरसुंगी ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी शिवश्री मेडिकलचे मालक वैभव तुकाराम मखरे ( वय 26 ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी खंडोबा माळ येथे फिर्यादी मखरे यांचे शिवश्री मेडिकल आहे. त्यांच्या गल्ली समोरच मनोज आढागळे हे राहतात. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, मनोज आढागळे हे मेडिकलमध्ये आले आणि ‘उधारी वरती औषध गोळ्या द्या’ अशी मागणी केली. यावेळी वैभव मखरे यांनी आम्ही उधारी वरती औषधे देत नाही असे सांगितले. त्यावेळी आढागळे याने वैभवला शिवीगाळ केली, शाब्दिक वाद वाढत मनोज अडागळे याने मारहाण करत दुकानात घुसून दुकानाची तोडफोड करून भाजी कापणाऱ्या चाकूने वैभव वरती सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात वैभव पडल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.