राज ठाकरे भाजपसोबत जाणार? लोकसभेसाठी राज ठाकरे भाजपला पाठबळ देणार? महायुतीला नवं इंजिन जोडलं जाणार? याच गोष्टी आता ऐकू येत आहेत आणि याचं कारण ठरलंय राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा. राज ठाकरे दिल्लीला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून या भेटीची चर्चा होती. राज ठाकरे भाजपच्या वाटेवर आहेत, मनसे भाजपची बी-टीम आहे, असंही बोललं जातं होतं. याच चर्चांना आताच्या या भेटीमुळे दुजोरा मिळतोय. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की, भाजपला राज ठाकरे का हवे आहेत? आणि याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला मनसेच्या इतिहासावर जरा नजर टाकावी लागते. साल 2005. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि आपला नवीन मार्ग त्यांनी निवडला. 9 मार्च 2006 – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरेंनी केली.
पक्ष स्थापनेनंतर पहिली निवडणूक मनसेने लढली ती मुंबई महापालिकेची. 2007 साली झालेल्या या निवडणुकीमध्ये मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. यासोबतच पुणे, नाशिक, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतही मनसेची जादू चालली. 2008 साली लोकसभा निवडणूकीला मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही मात्र अनेक मतदारसंघांमध्ये मनसेने काही लाखांची मतं घेतली. पण मनसेची खरी ताकद समजली ती 2009 च्या विधानसभा निवडणुकीत.
शिवसेना-भाजप युती आणि सत्तेत असल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचं तगडं आव्हान 2009 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेसमोर होतं. पण राज ठाकरेंनी आपली सगळी ताकद लावली आणि निकाल लागला तेव्हा मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. मुंबईत शिवसेनेलाही मनसेने मागे टाकलं होतं, पण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा तितका करिष्मा चालला नाही. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला. सभांना लाखोंची गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना मतं मात्र मिळत नाहीत असा आरोप सातत्याने झाला. केवळ शहरी पक्ष अशी मनसेची ओळख बनली आणि प्रभावक्षेत्रही मुंबई, नाशिकपर्यंतच सिमीत राहिलं.
पण तरीही भाजपला राज ठाकरे हवे आहेत, याचं पहिलं कारण आहे – हिंदूत्व
राज ठाकरेंनी भगवी शाल गुंडाळल्यापासून त्यांची हार्डकोअर हिंदुत्ववादी नेत्याची इमेज तयार झाली आहे. या इमेजचा फायदा सगळ्यात जास्त भाजपाला होऊ शकतो. 23 जानेवारी 2020 ला राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला, त्यामुळेच त्यांनी पक्षाच्या झेंड्याचा रंगही भगवा केला. त्यानंतरच्या प्रत्येक भाषणात, सभेत, मुलाखतीत राज ठाकरेंनी हिंदूत्वाचा मुद्दा पुढे केला. त्यानुसार मनसेने मशिदीवरील भोंगे, अयोध्येतील राम मंदिर या मुद्यांवर लक्ष केंद्रित केलं. इतकंच काय तर बाळासाहेबांचं हिंदूत्व काय होतं, याबद्दलही ते वेळोवेळी बोलताना दिसते.शिनसेनेत फुट पडल्यापासून बाळासाहेब आणि त्यांचं हिंदूत्व याबद्दल दोन्ही गटांत चढाओढ दिसून येते. यामध्ये राज ठाकरे ठळकपणे समोर येतात. राज यांना बाळासाहेबांची सावली म्हटलं जायचं. त्यांची पर्सनॅलिटी, वक्तृत्व कौशल्य यामध्ये नेहमी बाळासाहेबांशी साम्य असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं. नुकतंच न्यूज18 लोकमतला नितिन गडकरींनी मुलाखत दिली. त्यातही त्यांनी बाळासाहेब आणि राज यांच्यातील साम्याबद्दल वक्तव्य केलं. बाळासाहेबांचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये असल्याचं म्हटलंय. याच गोष्टींमुळे राज सांगतात ते बाळासाहेबांचं हिंदूत्व असं परसेप्शन लोकांमध्ये इतर दोघांच्या तुलनेत अधिक ताकदीने तयार होऊ शकतं
राज यांचं हेच हिंदूत्व भाजपसाठी पुरक ठरू शकतं. म्हणूनच संघानेही राज यांच्यासोबत चर्चेला हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. आणि त्यानंतर हालचालींना वेग आल्याचं दिसतंय. राज यांची राज्यातील भाजप नेत्यांशी मैत्रीही चांगली आहे. राज ठाकरेंच्या नव्या घराच्या पुजेला विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस ते नितिन गडकरी अशा भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून राज भाजपसोबत जातील अशा चर्चांना हवा मिळाली. या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच राज्यात जुळवून घेणं मनसे-भाजपला सोपं जाऊ शकतं.
दुसरा मुद्दा आहे – व्होटबॅंकेचा
मनसे होल्ड करत असलेली व्होटबँक. मनसेला आपले आमदार जरी निवडून आणता येत नसले तरी प्रत्येक निवडणूकांमध्ये मनसेची व्होटबँक राहिली आहे. 2009 च्या लोकसभेबद्दल आपण बोललो. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी 11 जागांवर उमेदवार उभे केले होते. ज्यांना एकूण 4.07 टक्के म्हणजे 15.04 लाख मतं मिळाली होती. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 13 आमदारांना एकूण 5.71 टक्के मतं मिळाली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला 1.5 टक्के तर विधानसभा निवडणुकीत 3.1 टक्के मतं मिळाली होती. आणि ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकूण 101 जागांवर उमेदवार उभे केले होते. या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून मनसेचे एकमेव उमेदवार राजू पाटील विजयी झाले. इतर 86 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणजे अगदी सुपडासाफ परिस्थिती असताना व्होटबॅंकेच्या गणिताने इतर पक्षांना बरच डॅमेज केलं होतं. या निवडणुकीत राज ठाकरेंना एकूण 2.25 टक्के म्हणजे 12,42,135 मतं मिळाली.
याच व्होटबॅंकेवर भाजपची नजर असल्याचं दिसतंय. कुठल्याही प्रकारे निवडणुकांमध्ये भाजपला डॅमेज होणं मंजूर नाहीय. म्हणूनच राज ठाकरेंची 2.25 टक्के व्होटबँक भाजपला हवी आहे. मनसे आणि भाजप यांचा मागच्या निवडणुकीत असलेला मतांचा आकडा 35% मतांचा होतो आणि याला राज ठाकरेंच्या झंझावाती प्रचाराची जोड मिळाली तर हा आकडा निश्चितपणे वाढू शकतो.
तिसरं – मराठी व्होटबॅंकेच्या गणितातून ठाकरेंच्या सेनेला डॅमेज करणं
उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार ही भाजपची हक्काची वोटबँक आहे. पण मराठी मतदारांमध्ये तितकासा भाजपाला स्ट्रॉंग होल्ड बसवता आलेला नाहीये. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जेव्हा भाजपची युती होती तेव्हा मराठी माणसाची व्होटबॅंक त्यांच्याकडे होती. मात्र युती तुटल्यापासून ही व्होटबॅंक दुरावली आहे. दक्षिण मुंबईमधील लालबाग, दादर, माहीम ते उपनगरातील भांडुप, विक्रोळी या मराठी बहुल भागात कित्येक वर्षे सेनेचा एकहाती दबदबा राहिला आहे. पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर याच मराठी माणसाच्या मनाची घालमेल होत आहे. अशात या मतदाराकडे एकमेव पर्याय उरतो तो मनसेचा. अलीकडच्या काळात मुंबईमधील या मराठी बहुल भागात सेनेला फाइट फक्त एकाच पक्षाने दिली होती ती म्हणजे मनसे. मनसेशी युती करणं हा मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपसाठी एकमेव ऑप्शन आहे.
या सगळ्या मुद्द्यांमुळेच भाजप राज ठाकरेंशी बोलणी करताना दिसतंय. ही युती झाली तर भाजपला काय फायदा होईल, हे वरील मुद्द्यांवरून स्पष्ट होतं. पण राज यांना काय मिळणार? तर त्यांना आपले उमेदवार निवडून आणण्याची ताकद मिळू शकते, राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करण्यात भाजपचे रिसोर्सेस मदतीचे ठरू शकतात. पण हे कितपत शक्य आहे? हे तर एखादी निवडणूक झाल्यानंतरच दिसेल, हे नक्की.